वाघोली – पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाघोली नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. वाघोली ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याची निर्मिती केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचे सत्कार करून स्वागत केले.
वाघोलीत वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून गुन्हेगारी व कायदा- सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने वाघोली नवीन पोलीस स्टेशन कार्यरत करण्यासाठी 4 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रालय मुंबई येथे भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सातव यांनी भेटून निवेदन दिले होते.
याशिवाय वाघोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांचा देखील पाठपुरावा या कमी होता. तत्कालीन ग्रामपंचायतच्या काळात ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने पोलीस ठाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेचा प्रस्ताव देखील दिला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची वाघोली पोलीस ठाणे व्हावी ही मागणी होती.
अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी देखील याबाबतीत पत्रव्यवहार केला होता. पायाभूत सुविधा, त्यासाठी अपेक्षित खर्चाची तरतूद आणि पोलिस ठाण्यांची रचना, हद्द, मनुष्यबळ, वाहने तरतूद करून निधी उपलब्ध करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.
त्यावेळी लवकर स्वतंत्र वाघोली पोलीसस्टेशन होईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी संदीप सातव यांना दिले होते. त्यानंतर लगेच राज्य शासनाकडून पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडून प्रस्ताव मागवण्यात आला.
1 नोव्हेंबर 2023 पुणे पोलीस आयुक्त यांनी वाघोली स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला होता. राज्य शासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता देऊन वाघोली पोलीस स्टेशन साठी 8 कोटी 75 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.
वाघोली स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यरत झाले असून, त्याबद्दल वाघोली नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आदींचे ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले आहेत.
वाघोली ची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने नवीन पोलीस ठाण्याचे निर्मिती केली असून ही निर्मिती नागरिकांसाठी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणारी ठरणार आहे. सततच्या मागणी व पाठपुराव्यास यश आल्याने ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, व पोलीस अधिकारी यांचे आभार मानण्यात येत आहे.
– रामभाऊ दाभाडे, (माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे)