पुणे : शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या पतीपासून पत्नीची सुटका झाली आहे. घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने नोटीस बजावूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नीच्या बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर एकतर्फी घटस्फोट मंजुर केला आहे. पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता पहाडे यांनी याबाबत आदेश दिला आहे.
माधव (वय ३२) आणि माधवी (वय २५) अशी दोघांची नावे आहेत. (नावे बदलली आहेत) माधवीने येथील न्यायालयात ॲड. नंदकिशोर येरंडे आणि ॲड. माऊली शिंदे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये दोघांचा पारंपारिक पध्दतीने पाहणी करून विवाह झाला. दोघांनी सुरूवातीला काही दिवस सुरळीत संसार केला. त्यानंतर पतीने त्रास देण्यास सुरूवात केली.
डिसेंबर २०१६ ती गरोदर राहिली. त्यावेळी तो तिच्याशी सतत भांडत असत. गरोदर असतानाही एके दिवशी मद्य प्राशन करून मारहाण करून तिचे तोंड फोडले होते. त्यानंतर त्या अवस्थेत घरातून तिला हकलून दिले. ती माहेरी गेली. त्यानंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. मात्र, मुल झाल्यावर सुधरेल, असे म्हणत आईने तिला पुन्हा सासरी सोडले. मात्र, तिचा त्रास सुरूच होता.
दरम्यान आई बाळंतपणासाठी तिला माहेरी घेऊन गेली. मुलगा झाल्यानंतर सासरची मंडळी तिला पाहण्यास गेले नाहीत. त्याने गाडीसाठी म्हणून तिच्या आईकडून २५ हजार रुपये घेतले. दरम्यान दुसऱ्या व्यक्तीची गाडी चोरल्याचे निष्पन्न झाले. यावेळी सर्वांनी मिळून त्याला सोडविले. या सर्व त्रासाला कंटाळून तिने दाखल केलेला दावा न्यायालयाने एकतर्फी निकाली काढला.
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. न्यायालयाने नोटीस बजावूनही तो हजर राहिला नाही. या परिस्थितीत न्यायालयाने दिलेल्या एकतर्फी घटस्फोटामुळे तिची सुटका झाली आहे. महिला पक्षकाराला न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे.
– ॲड. नंदकिशोर येरंडे, (पत्नीचे वकील)