Pune News : महालक्ष्मी देवीचे सुवर्ण रूप! १६ किलो सोन्याच्या साडीमुळे भाविकांची गर्दी, पण ही परंपरा कधीपासून? जाणून घ्या अनोखी परंपरा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली होती. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते.
मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, नीलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदींनी उत्सवाचे आयोजन केले.डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे, यासाठी दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवण्यात येते.
श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रूप पाहण्यासाठी भक्तांकडून दरवर्षी गर्दी होते, असे डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी सांगितले.मंदिरामध्ये महालक्ष्मी देवीला घालण्यात आलेली सोन्याची साडी, रावणदहन पाहण्यासाठी, तसेच संपूर्ण नवरात्रीमध्ये भक्तांची रेकॉर्डब्रेक गर्दी यावर्षी पाहण्यास मिळाल्याचे राजकुमार अग्रवाल म्हणाले.
विजयादशमीला रावणदहन..
विविध सामाजिक समस्यांच्या प्रतीकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन मंदिरासमोर करण्यात आले. या वेळी २५ फूट उंच प्रतीकात्मक रावणाचे दहन करण्यात आले. या वेळी प्रभू श्रीराम यांची वानरसेना आणि रावणाची सेना यांच्या युद्धाचा जीवंत प्रसंगही सादर करण्यात आला. प्रतीकात्मक रावण दहन करून समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश देण्यात आल्याचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी सांगितले.





