पुणे – लोणावळा येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे ग्लास स्कायवॉक प्रकल्प उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लोणावळा येथे ग्लास स्कायवॉक उभारण्याची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सोपविण्यात आली आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे.
लोणावळ्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेला ग्लास स्कायवॉक पर्यटन विभागाने उभारावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या.
परंतु पर्यटन विभागाने त्यास असमर्थतता दर्शविली. त्यामुळे पवार यांनी “पीएमआरडीए’ने या प्रकल्पाचे काम घ्यावे, अशा सूचना दिल्या. त्यानुसार हा निर्णय झाला आहे. प्रकल्पासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना कॉंक्रीटऐवजी दगडांचा वापर करावा लागणार आहे.