पुणे – सध्याची बदललेली जीवनशैली आणि वातावरणात होणारे बदल तसेच मोबाईल व संगणकाचा अतिवापर यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.
यावर एक उपाय म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे कर्मचारी कल्याण समिती आणि पुणे अंध जन मंडळ संचलित एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 मार्च 2025 रोजी विद्यापीठाच्या गुलटेकडी येथील आवारात मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते.
टिमवीचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक असे 150 पेक्षा अधिक पुरुष आणि महिलांनी या शिबिरात डोळे तपासणी केली. ज्यांच्या डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आढळला त्यांच्यासाठी सोमवारी 24 मार्च 2025 रोजी एचव्ही देसाई रुग्णालयाच्या वतीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे.
सदर नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत असताना प्रत्येकाने आपल्या डोळ्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिबिराच्या आयोजना करता कर्मचारी कल्याण समितीचे डॉ. प्रवीण जाधव डॉ. कार्तिकी सुबकडे, सहाय्यक प्राध्यापिका रीना भाटी, पल्लवी जोशी आणि ऋषिकेश केळकर यांनी सहकार्य केले याप्रसंगी विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे, सचिव अजित खाडीलकर तसेच एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय यांचे मंगेश कुलकर्णी आणि नेत्र रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.