पुणे – चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून पसार झालेल्या नराधमास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. दोन दिवसांपासून पोलीस आरोपीच्या मागावर होते.
विजय स्वामी बामु (४०, रा. घोरपडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बामु याने मानलेल्या बहिणीच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी मुंढवा भागात घडली होती.
याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत होते.
गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पथक हद्दीत गस्तीवर असताना गुन्ह्यातील आरोपी हा मुंढवा रेल्वे पुलाखाली येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विक्रांत सासवडकर यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक नंदकुमार बीडवई यांच्या मार्गदर्शनाखाली छबू बेरड, अंमलदार दत्तात्रय खरपुडे, संदीप येळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पुढील तपासासाठी आरोपीला मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.