Pune news : त्रिमूर्ती चौक ते दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तिरंगा चौकात असलेल्या श्रीजी हॉटेलला सायंकाळी सुमारे ७ वाजून ६ मिनिटांनी आग लागली. याबाबतची माहिती मध्यवर्ती अग्निशमन केंद्राकडून कात्रज अग्निशमन केंद्राला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी फायरगाडीसह घटनास्थळी पोहोचून होज रील व तीन होजच्या साहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाने वेळेत आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीत हॉटेलचे किरकोळ नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या कारवाईत कात्रज अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रदीप खेडेकर, ड्रायव्हर फारूख शेख तसेच फायरमन रामदास शिंदे, अक्षय देवकर आणि अभिषेक खाटपे यांनी सहभाग घेतला. घटनास्थळी नगरसेवक अरुण राजवाडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे तसेच धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांनी भेट दिली.