पुणे : शहरातील मेट्रोचे काम सुरू असताना गेली ६ ते ८ वर्षांपासून कसबा मेट्रो स्टेशन येथील साततोटी चौक ते व्यवहार आळी मंडळ ते फडके हौद हा रस्ता रहदारीस बंद करण्यात आला आहे. मात्र, आता मेट्रोचे काम पूर्ण झाले असले तरी नवीन रस्ता करण्याच्या नावाखाली हा रस्ता बंदच ठेवण्यात आला असल्याने या परिसरातील सर्व व्यावसायिक व दुकानदारांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीनं सुरू करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
साततोटी पोलीस चौकी येथे दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील फडके हौद हे भूमीगत स्टेशन आहे. या स्टेशनच्या कामासाठी महामेट्रोच्या सूचनेनुसार महापालिकेकडून हा रस्ता बंद करण्यात आला होता. परिणामी या रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिक व दुकानदारांचा व्यवसाय ठप्प असल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
सदर ठिकाणी हा रस्ता बंद असल्यामुळे मेट्रो कामाच्या धुराळा व अव्यवस्थेमध्ये नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कसबा मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी मेट्रो सुरू आहे. मेट्रो प्रशासनाला विचारले असता हा रस्ता आजपर्यंत रहदारीस लवकरच सुरू होणार आहे, असे अनेक महिन्यांपासून हे सांगत आहेत. परंतु हा रस्ता आजपर्यंत रहदारीस खुला झालेला नाही.
त्यामुळे हा रस्ता सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यचा इशारा राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कसबा मतदारसंघ अध्यक्ष गणेश नलावडे, संतोष कोऱ्हाळकर, दिलीप आढाव, राजेंद्र कोकाटे, डॉ. वैशाली कोकाटे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी दिला आहे.