पुणे : लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स (आयओडी) या संस्थेच्या सदस्यपदी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. ‘आयओडी’ ही युनायटेड किंग्डमसह जगभरातील कॉर्पोरेट संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांची सर्वोच्च व्यावसायिक संघटना आहे.
या संघटनेशी जगभरातील ३० हजाराहून अधिक मंडळ सदस्य जोडलेले असून, भारत, दुबई, सिंगापूर आणि लंडन अशा ठिकाणी वार्षिक परिषदांमधून सदस्य मंडळासंबंधित विविध विषय आणि प्रश्नांवर चर्चा होते. या सदस्यांमध्ये वैविध्यता असून, त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी, लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, बँकर, सल्लागार, शिक्षणतज्ज्ञ आदींचा समावेश आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा व्यापक आणि वैविध्यपूर्ण अनुभव लक्षात घेऊन, त्यांना संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संचालक, व्यावसायिक, धोरण निर्माते इत्यादींसह चांगल्या नेटवर्किंगची संधी देते. या सदस्यत्वामुळे व्यवसाय सल्ला प्रकल्प, इंटर्नशिप्स आणि इतर उपक्रमांतून सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना भारतातील आणि परदेशातील कंपन्यांशी जोडण्यास मदत होणार आहे.
डॉ. संजय बी. चोरडिया जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले उत्साही शिक्षणतज्ज्ञ, ग्लोबल कोच, उद्योग आणि व्यवस्थापन व्यावसायिक, दूरदर्शी, परोपकारी व्यक्तिमत्व आहेत. त्यांना ऑटोमोबाईल उद्योगातील ४० वर्षांचा आणि शिक्षण क्षेत्रातील २८ वर्षांपेक्षा अधिक प्रदीर्घ अनुभव आहे. केंद्र सरकारच्या कच्चा माल संचालन समिती, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, टेलिफोन सल्लागार मंडळ इत्यादी अनेक संस्थांमध्ये सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, एआयएमए, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ प्रोडक्शन इंजिनियर्सचे फेलो सदस्य, तसेच विविध संस्थांचे पॅट्रॉन सदस्य / आजीवन सदस्य आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य आहेत आणि अमेरिकेतील ग्लोबल चेंबरच्या इन्स्टिट्यूट इंडस्ट्री पार्टनरशिपचे अध्यक्ष आहेत.
डॉ. चोरडिया यांच्या नावावर १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट्स असून, त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या नियुक्तीबद्दल सूर्यदत्त परिवाराच्या त्यांचे अभिनंदन करण्यात आले.