Pune News : येरवड्यात रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणे भाजपच्या माजी नगरसेवकाला महागात पडले. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक, त्याच्या मुलासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. माजी नगरसेवक किशाेर राजाराम विटकर (वय ५१), हर्षद किशोर विटकर (वय २८), गणेश पोपटराव ढोकळे (वय ४०), गणपत जिवराज पुरोहित (वय ५१), विकास मच्छिंद्र सोनवणे (वय ४०), रोहित मधुकर वैराळ (वय ३५, सर्व रा. येरवडा), रामेश्वर अरुण दुर्लेकर (वय ३२, रा. वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलीस कर्मचारी बलजीत थोरात यांनी लक्ष्मीनगर ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर विटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पोलिसांच्या मााहितीनुसार, येरवड्यातील गाडीतळ परिसरात विटकर यांचे कार्यालय आहे. शुक्रवारी (२२ मे) कार्यालयासमोर रस्त्यावर टेबल टाकून केक कापला. विटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री एकच्या सुमारास आतषबाजी केली. या सर्वांनी सार्वजनिक शांततेता भंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.