पुणे : राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतील काॅग्रेसने पक्षाची तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार काॅग्रेसकडून शहरातील आठही विधानसभा मतदारसंंघासाठी अर्ज मागविण्यात आले असल्याचे माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.
येत्या ५ आॅगस्ट पर्यंत हे अर्ज सादर करण्याची मुदत असून हे अर्ज त्यानंतर प्रदेश काॅग्रेसकडे सादर केले जाणार आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडील नेते विधानसभा निवड्णूका एकत्र लढणार असल्याचे सांगत असले काॅग्रेसकडून मात्र पक्षाची स्वबळावर लढण्याचीही तयारी केली जात आहे. तर, पुण्यात विधानसभा निवडणूकीसाठी सर्वात आधी अर्ज मागवित काॅग्रेस तयारीला लागल्याचे चित्र आहे.
शहराध्यक्ष शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. नानाभाऊ पटोले निर्देशावरून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या पुणे शहरातील २०८ वडगांवशेरी, २०९ शिवाजीनगर, २१० कोथरूड, २१२ पर्वती, २१४ पुणे कॅन्टॉन्मेंट, २१५ कसबा, २११ खडकवासला, २१३ हडपसर या आठही मतदार संघातून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. पक्षाच्या शहर कार्यालयात हे अर्ज ५ ऑगस्ट पर्यंत स्विकारले जाणार असून पुढे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात येणार आहेत.