हडपसर – पाणी टंचाई, वाहतुक कोंडी, गुन्हेगारी मुक्त हडपसर बनवण्याचे उद्दिष्ट घेऊन ही निवडणूक लढवत आहे. देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात हडपसरच्या सर्वंकष विकासासाठी कटिबद्ध राहील, असा शब्द हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी दिला. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, जगताप यांनी पदयात्रा काढून मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला आहे.
शनिवारी शिंदेवस्ती ते मिरेकर वस्ती अशी पायी वारी करत जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.यात्रेदरम्यान ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर, कैलास कोद्रे, वसंत मोरे, प्रवीण तुपे, समी तुपे, निलेश मगर, बंडू गायकवाड, योगेश ससाणे, दिलीप शंकर तुपे, शमशुदिन इनामदार, राहुल घुले, तानाजी लोणकर आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यात्रेदरम्यान काही स्थानिक महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रशांत जगताप यांनी सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन दिले. यावेळेस तुतारीच वाजणार अशा घोषणा दिल्या. यात्रेदरम्यान जगताप यांनी ग्रामस्थ, व्यापारी, मजूर वर्ग यांना भेट दिली व त्यांचा समस्या जाणून घेतल्या. वरिष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वानीच ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ असा जयघोष केला. त्यामुळे वातावरणात उत्साह संचारला होता.