पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी मुलाखती दिलेल्या उमेदवारांची निवड यादी विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत विद्यापीठाकडून निवड झालेल्या संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. विद्यापीठातर्फे विविध विभागांमध्ये शिक्षकीय पदे भरण्यासाठी १३३ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले होते. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांची यादी विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक प्राध्यापक करार पद्धतीने पदे भरण्यासाठी २६ ऑगस्ट २०२४ला परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. या परिपत्रकाला अनुसरून उमेदवारांकडून ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात आले. आता पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना मुलाखतीत मिळालेल्या गुणांसह गुणवत्ता व निवड यादी तयार करण्यात आली आहे.
या गुणवत्ता व निवड यादी मधील उमेदवारांना २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत संबंधित विभागामार्फत नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना दिलेल्या माहिती आणि कागदपत्रांच्या सत्यत्तेच्या पडताळणीला अधीन राहून ही निवड यादी तयार करण्यात आली आहे, असे परिपत्रक विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधी करिता ही नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना काही महिनेच विद्यापीठात करार पद्धतीवर काम करण्याची संधी मिळणार आहे.