Pune News | दुकाने उघडल्यास कारवाई करणार – आयुक्त विक्रम कुमार

पुणे – महापालिकेकडून शहरातील अत्यावश्‍यक वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार, महापालिकेने काढलेल्या या आदेशाविरोधात शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी आपली दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे, गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यास राज्य शासनाच्या नियमांची अंमलबजावनी केली जाईल असा अप्रत्यक्ष इशारा महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी दिला आहे. तसेच शहरात घातलेल्या निर्बंधाची अधिक कडक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून पोलिसांना आणखी काही अधिकार दिले जाणार असल्याचेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

महापालिकेने 5 एप्रिलपासून शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद केली आहेत. तसेच शुक्रवार ते सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी असून राज्य शासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात आली असून गुरुवारी मानवी साखळी करण्यात आली आहे. तर, शुक्रवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने उघडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांना विचारणा करण्यात आली.

यावेळी आयुक्त म्हणाले, शहरात रुग्णसंख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने घालून दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. शासनाकडून सुधाररित आदेश आले तर त्याचीही अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे महापालिकेकडून व्यावसायिकांवर कारवाईचे संकेतच आयुक्‍तांनी शासनाच्या आदेशाचे नाव घेत दिले असल्याचे चित्र आहे.

शिष्टमंडळाची मागणीही फेटाळली
दुपारी व्यावसायिक संघटनांचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्‍तांच्या भेटीस गेले होते. या मंडळाने दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली. यावेळी महापालिका आयुक्‍तांनी शहरातील सध्याची स्थिती दुकाने उघडल्यास आणखी बिघडेल असे सांगत; राज्य शासनाचे आदेश आले तरच महापालिका आपले आदेश बदलेल असे सांगत; जीव महत्वाचा का व्यावसाय असा प्रतिसवाल व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींना करत आदेश मागे घेण्यास नकार दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.