पुणे – खुनाच्या गुन्ह्यात मागील सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील काशीगाव, मांडवी पाडा येथून अटक केली. आरोपी हा मागील सात वर्षे नाव बदलून वेगवेगळ्या भागात वास्तव्य करत होता. सुनील लक्ष्मण पवार (३४, रा. गोखलेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पवार याच्यावर २०१७ साली चतुशृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. किरकोळ कारणावरून त्याने एकाचा खून केला होता. त्यानंतर पवार फरार झाला होता. पोलिसांनी पवार याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. न्यायालयाने त्याच्याविरोधात स्टॅंडिंग वॉरंट देखील काढले होते. मात्र, तरीही तो न्यायालयात हजर झाला नाही. तेव्हापासून न्यायालयाने त्याला फरार घोषित केले.
यादरम्यान गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक प्रवीण काळोखे यांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हा ठाणे जिल्ह्यात नाव बदलून वास्तव्यास असल्याची माहिती अंमलदार बाळू गायकवाड, महेश पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ठाण्यातून आरोपी पवारला अटक केली.
पोलिसांना पाहताच पवार पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. मागील सात वर्षात तो संभाजीनगर, रांजणगाव या भागात नाव बदलून राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला चतुशृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.