कोंढवा – कोंढवा-येवलेवाडी मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते खोदाईमुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्ते खोदून ठेवले आहेत, त्या रस्तांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने वाहतुकीस अडथळा व अपघात घडत आहेत. पालिका प्रशसानाने कोंढवा परिसराती अशा रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कोंढवा-येवलेवाडी मार्गावर मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते विविध केबल्स, ड्रेनेजलाइन, पावसाळी लाइनसाठी खोदाई केल्यानंतर अशा रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी रस्ता दुरूस्तीच्या नावाखाली केवळ मुरम, खडी पसरविली आहे. खोदाई केल्यानंतर राडारोडा तसाच जागोजागी पडून आहे. अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात घडत आहेत. रस्त्याकडेने खोदाई करणे गरजेचे असताना रस्त्याच्या मधोमध खोदाई केली गेल्याने निम्मा-अर्धा रस्ता खराब झाला आहे. आता, पावसाळा सुरू होत असल्याने किमान खोदून ठेवलेल्या रस्त्यांची तरी दुरूस्ती करण्यात यावी, चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अशी होत आहे.