पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून तसेच मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवरून राज्यासह देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुण्यातही धडाडणार आहे. त्यासाठी दि.21 ते 28 मेदरम्यान परवानगी मिळावी, असे पत्र शहर मनसेकडून पोलीस आयुक्त कार्यालयासह, डेक्कन पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे.
प्रामुख्याने नदीपात्रात सभा घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली असून त्यासह एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानाचीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप या सभेसाठी पोलिसांकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसली तरी बुधवारी सभेबाबत चित्र स्पष्ट होईल, असे मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई आणि ठाण्यात राज ठाकरे यांची सभा झाली. त्यानंतर शिवसेनेची मुंबईत झालेली सभा, ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि त्यानंतर शहर मनसेत असलेला अंतर्गत वाद या पार्श्वभूमीवर पुण्यात होणाऱ्या सभेत मनसे अध्यक्ष काय बोलणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.