कोथरूड (सागर येवले) – महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता 31 मे रोजी होणाऱ्या महिला आरक्षणाकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष असणार आहे. यातून अंदाज बांधत काही जणांनी कोणता प्रभाग “फिक्स’ करायचा याची ठोकताळे बांधण्यास सुरुवात केली आहे. कोथरूड परिसराचा विचार करता येथे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व येथून भाजपाचाच उमेदवार निवडून येणार, अशी सध्याची स्थिती असल्याचे सांगितले जाते.
मात्र, सध्याची प्रभाग रचना पाहता तसेच महिला आरक्षणातून येथील स्थिती बदलू शकते. बदललेल्या प्रभाग रचनेमुळे 2017 च्या निवडणुकीत पक्ष बदलून भाजपमध्ये आलेले उमेदवार पुन्हा स्वगृही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोथरूडच्या जुन्या-नव्या प्रभागामध्ये उमेदवाराबरोबरच पक्षाचे मतदान ठरलेले आहे. त्यातच आघाडी सरकारमधील पक्षाचा हे प्रभाग फायद्याचे असल्यामुळे भाजपमधील काही उमेदवार स्वगृही जाण्यासाठी चाचपणी करू शकतील. अन्य पक्षातील इच्छुकही पक्ष बदलाचा निर्णय ऐनवेळी घेऊ शकतात. त्यामुळे निवडणूक जशी जवळ येईल तसे “आल्या घरी परत फिरा रे…’ अशी स्थिती दिसू शकते.
भाजपचे वर्चस्व असलेल्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत तीन प्रभाग येतात. त्यामध्ये 12 नागरसेवकांपैकी 8 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. दोन कॉंग्रेसचे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. मात्र, तीनच्या प्रभागामुळे प्रभागाची संख्या चार झाली आहे. यातील एक प्रभाग सोडला तर अन्य तीन प्रभाग हे महाविकास आघाडीच्या फायद्याचे ठरतील असे सध्याचे तरी चित्र आहे. त्यातही महिला आरक्षणानुसार यामध्ये मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे कोथरूड आघाडीच्या ताब्यात जाणार की भाजप वर्चस्व कायम ठेवू शकणार हे 31 मे रोजी होणाऱ्या आरक्षणातूनच स्पष्ट होणार आहे.
…विरोधात तगडा उमेदवार असणार
जुना 10 आणि नवा प्रभाग क. 32 हा भाजपच्या ताब्यात आहे. प्रभागरचनेत तोडफोड झाल्याने हा प्रभाग आघाडीसाठीही आता फायद्याचा ठरू शकतो. या प्रभागात सोसायटी भागासह वस्ती भाग अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी चुरशीची लढत या प्रभागात होऊ शकते. प्रभाग 33 नव्याने वाढलेला असून यामध्ये बावधन खुर्दचा भाग आणि महापौर यांचा तोडलेला अर्धा भाग असा मिळून हा प्रभाग तयार झाला असल्याने हा प्रभाग भाजपसाठी अनुकूल असल्याचे म्हटले जात असले माजी महापौरांना शह देण्यासाठी विरोधक तगडा उमेदवार येथे देण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे.