पुणे- महापालिका रुग्णालयांच्या सगळ्या “ओपीडी लिंकअप’ करण्याचे काम “स्मार्ट सिटी’कडून सुरू असताना हेच काम करण्याचा घाट महापालिका प्रशासनाकडून घातला जात आहे. सत्ताधारी पक्षातील एका पदाधिकाऱ्याच्या मर्जीतून ही निविदा काढण्याचा उठाठेव सुरू असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. येत्या 15 दिवसांत ही निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
औषधांची अधिक गरज आहे? कोणत्या औषधांची विनाकारण खरेदी केली जाते आहे का? कोणत्या ओपीडीमध्ये औषधे मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत किंवा नाहीत यांची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी महापालिकेच्या या सगळ्या ओपीडीतील औषधालय आणि रुग्णालयातील औषधालय एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने लिंकअप केले जाणार आहेत. हे सगळे दवाखाने गाडीखाना येथील औषधांच्या मुख्य केंद्रांशी जोडले जाणार आहे. केंद्रीभूत पद्धतीने हे काम केले जाणार आहे. या कामासाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. मात्र, असे सॉफ्टवेअर स्मार्ट सिटीकडून विकसित करण्यात येत असल्यामुळे तत्कालीन अतिरीक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ही योजना न राबविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, स्मार्ट सिटीकडून हे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम देखील सुरू आहे, असे असताना महापालिका प्रशासाने स्वत:च्या स्तरावर हेच सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे एकाच कामासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी खर्च करणार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या सॉफ्टवेअर निर्मितीसाठी 40 लाख रुपयांचा विशेष निधी प्रशासनाने मंजूर करून घेतला आहे. त्याची निविदा येत्या 15 दिवसांत ही निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. – रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका