पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त मार्गदर्शकांकडे (गाईड) कोणत्या संवर्गातील किती जागा द्याव्यात याबाबतचा निर्णय न झाल्यामुळे पीएच.डी. प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलावी लागत आहे. मात्र, नव्याने मान्यता मिळालेल्या मार्गदर्शकांना प्रवेशाची संधी मिळू नये, यासाठी विद्यापीठातील काही विभाग प्रमुखांकडूनच पीएचडी प्रवेशप्रक्रिया जाणीवपूर्वक लांबणीवर टाकण्यात येत असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
पुणे विद्यापीठातील विविध विभाग व पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील संलग्न संशोधन केंद्रातील पीएच.डी. प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागवले. पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. तसेच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, मार्गदर्शकांना संवर्ग निहाय जागांचे वितरण करण्याची माहिती अद्ययावत नसल्याचे समोर आले. तसेच यापूर्वी एका गाईडकडे खुल्या संवर्गातील, मागासवर्गीय व परदेशी विद्यार्थी असे वितरण केले जात होते.
परंतु, आता एकूण विद्यार्थी आणि गाईडकडे उपलब्ध असणाऱ्या जागांचे गणित मांडून नवीन नियमानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गाईड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन केली असून, त्यानुसार कार्यवाही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
समितीची आवश्यकता का?
विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएचडी प्रवेशासंदर्भात सर्वसमावेशक नियमावली प्रसिद्ध केली आहे. मात्र, विद्यापीठाने वेळकाढूपणा करीत त्यासाठी समिती नेमली आहे. यूजीसीचे नियमावली स्पष्ट असताना समिती नेमण्याचा अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नव्या मार्गदर्शकांचा प्रस्ताव प्रलंबित
उच्च शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानंतर पुणे विद्यापीठाने नवे मार्गदर्शक होऊ इच्छिणाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले आहे. त्यामुळे आता लवकरच मार्गदर्शकांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शक निवडणे शक्य होईल, अशी शक्यता होती. मात्र विद्यापीठाने नव्या मार्गदर्शकांसाठी सादर केलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय घेतले नाही. त्यामुळे विद्यापीठ कुणाला पाठीशी घालत विद्यार्थ्यांचे नुकसान करीत असल्याची भावना निर्माण होत आहे.