पुणे – मिळकतकराची 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्यांसाठी महापालिका “मिळकतकर अभय’ योजना राबवणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. या मिळकतकर धारकांची थकबाकी सुमारे 7 हजार कोटींच्या आसपास आहे. त्यातच हे मालमत्ताधारक कर भरत नसल्याने ती दरवर्षी वाढतच आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाची थकबाकी 10 हजार कोटींवर गेली. तर, दरवर्षी या थकबाकीवर आकारण्यात येणाऱ्या 24 टक्के दंडाच्या रकमेमुळे दरवर्षी ही रक्कम वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने मागील वर्षी मिळकतकर अभय योजना राबवली होती. मात्र, ती केवळ 50 लाखांपर्यंत थकबाकी असलेल्यांसाठीच होती. त्यातून पालिकेस जवळपास 485 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तर, 50 लाखांपेक्षा अधिकच्या रकमेसाठीही ही योजना राबविण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे मागील वर्षी या योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी चालू आर्थिक वर्षात पुन्हा अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 कोटी रुपयांपर्यंतच्या थकबाकीदारांना थकित मिळकतकराच्या दंडावर 70 ते 80 टक्के इतकी सवलत देण्याचे प्रस्तावित आहे. मागील वर्षापेक्षा यंदा अधिक उत्पन्न मिळेल, असा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय मागील वर्षी या योजनेचा लाभ न मिळालेल्यांनाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता या योजनेला किती थकबाकीदार प्रतिसाद देतात, यावर महापालिका धोरण ठरवणार आहे.
एक महिनाच असेल योजना
प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “या वर्षीची अभय योजना एका महिन्याचीच असणार आहे. त्यासाठी 10 डिसेंबर 2021 ते दि. 10 जानेवारी 2022 या कालावधीसाठी असणार आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकांची आचारसंहिता असल्याने थकबाकीदारांना मुदत वाढवून मिळणार नाही. मागील वर्षी स्थायी समितीने या योजनेस एकदा मुदतवाढ दिली होती. त्यामुळे महापालिकेस मुदतवाढीनंतर उत्पन्न वाढवून मिळाले होते. दरम्यान, मागील वर्षी अभय योजनेचा लाभ घेतलेल्या मात्र यंदा पुन्हा कर थकविलेल्या थकबाकीदारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.’