कात्रज – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या हौसे-गवशांचे फ्लेक्स झळण्यासाठी स्पर्धा लागली आहे. कधीही न दिसलेले चेहरे झळकू लागले आहेत. पालिका निवडणूक लढो न लढो… जिंकून येऊ किंवा न येऊ परंतु, दोन-चार कार्यकर्ते हाताशी धरून फ्लेक्सवर “भावी नगरसेवक’ बिरूदावली मिरवण्याची हौस अनेकजण पुरवून घेत आहेत. यात “अर्ज माघारी’चे आर्थिक गणितही लपलेले असल्याने अशा “भावी नगरसेवकां’च्या फ्लेक्सला ऊत आला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण उपनगर परिसरातील कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज-कोंढवा रोड, स्वारगेट-सातारा रस्ता, आंबेगाव पठार,
संतोष नगर, कात्रज चौक, गुजर निंबाळकरवाडी रस्ता अशा ठिकाणी मुख्य रस्ता असो की गल्लीबोळातील रस्ता, अगदीच काय तर विजेचे, पथदिव्यांचे खांब, महावितरणची डीपी अगदी रस्त्यालगतच्या कुठल्याही भिंतीवरही कार्यक्रमाचे, वाढदिवसाचे, नेमणूक याशिवाय इतर कुठल्याही कारणाच्या निमित्ताने “भावी नगरसेवकां’चे फ्लेक्स झळकत आहेत. महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने स्थानिक, राजकीय दबावाला न जुमानता विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. महसूल बुडविणाऱ्यांवर कायद्याचा दंडुका उगारणे गरजेचे ठरणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कार्यक्रम छोटा फ्लेक्स मोठा…
“भावी नगरसेवक’ यांच्यासह दोन-चार कार्यकर्ते, येणारे-जाणारे आणि काही हौशी “कलावंत’ अशांना जमवून छोटासा (भव्यदिव्य) कार्यक्रम घेतला जाणार असला तरी अशा कार्यक्रमांचे फ्लेक्स मात्र मोठे लागत आहेत. राजकीय पक्षाचे कोणतेही चिन्ह नसलेल्या फ्लेक्सवर असलेल्या फोटोंपैकी या कार्यक्रमाला उपस्थित असतीलच असेही नाही. अशा केवळ बडेजाव कार्यक्रमांची मोठी रेलचेल सध्या पाहायला मिळत आहे.
फुकट्या फ्लेक्समुळे विद्रुपीकरण…
महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाची परवानगी घेऊन योग्य ते शुल्क, कर भरून फ्लेक्स लावणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. याच कारणातून “भावी नगरसेवकां’कडून विनापरवानगी फ्लेक्स लावले जात असल्याने उपनगराचे विद्रुपीकरण होत आहे.