पुणे- “महापालिकेत बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या भाजपला अखेर पुणेकरांच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधासमोर झुकावे लागले आहे. ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय स्थगित करून पुढे ढकलावा लागला आहे.
पुणेकरांच्या हक्काच्या जमिनी कोणाच्या तरी घशात घालण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना लगावलेली चपराक आहे. गणरायाने भाजपला उशिरा का होईना सुबुद्धी दिली आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली आहे.
जगताप म्हणाले, “हा प्रस्ताव म्हणजे एक प्रकारे या मालमत्तांच्या विक्रीचा घाट होता. ज्या जागा भाजपने विक्रीस काढल्या होत्या, त्यात सर्वाधिक 74 जागा कोथरूड मतदारसंघातील होत्या. तेथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिनिधित्व करतात. यांच्या परवानगीनेच विक्रीस काढल्याचाही आमचा दावा होता.’