Pune News : पुण्यातील आमदाराच्या मामांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक अशी घटना घडलीय. चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याचं समोर आलंय. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे. सतीश वाघ असं अपहरण झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे सकाळी सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ब्लू बेरीसमोर थांबले होते. तिथं अचानक एक चारचाकी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून उतरलेल्या दोघांनी सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं.
सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांना सोलापूरच्या दिशेनं नेलं असल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिलीय.