‘वॉटर कप’मध्ये सांगवीकरांचा सहभाग

माण तालुक्‍यातील महिमानगडमध्ये श्रमदान

सांगवी – सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील महिमानगड येथे “सत्यमेव जयते वॉटर कप’ योजने अंतर्गत श्रमदान करण्यात आले असून, सांगवीतील सातारा मित्र मंडळाचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

गेली अनेक वर्ष या भागात पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. पाण्याविना शेती करता येत नाही. अनेक वर्ष शेती पडीकच आहे. गावातील अनेक लोकांनी पाण्यासाठी स्थलांतर केले. गावात एकी नसल्यामुळे आजपर्यंत या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही पण आज या गावाने सत्यमेव जयते वॉटर कप योजनेत भाग घेऊन जोमाने कामाला सुरवात केली आहे. याचा सकारात्मक परिणाम येत्या पावसाळ्यात दिसून येईल. आपल्या गावात पाणीच पाणी होणार, या आशेने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गावातील तरुणांनी अखिल भारतीय धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कूचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला एक करून श्रमदानाला सुरवात केली आणि बघता बघता श्रमदानाचे काम सुरू झाले आणि दररोज दोनशे ते अडीचशे गावकरी श्रमदान करतात. यात तरुण व प्रौढ व्यक्तीच नाही, तर अनेक शाळकरी मुले मुलीही या श्रमदानात भाग घेऊन मन लाऊन काम करत आहेत. महिलाही सहभागी झालेल्या आहेत.

याबाबत सातारा मित्र मंडळ सांगवीचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी सांगितले, की या गावाला या कामासाठी बराच खर्च आहे. यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे . मग ती श्रमदानाची, आर्थिक, साहित्याची गरज आहे. आमच्या वतीने आम्ही मदत करू असे ते म्हणाले. यावेळी टाटा मोटर्सचे कामगार रवींद्र कोकाटे यांनी या पाणी फौंडेशन कमिटीला अकरा हजार रुपयांची मदत केली. आशमन मुलाणी याने दिलेली “आल गुड गुडे , नाल गुड गुडे, दुष्काळ डिश्क्‍याव डिशक्‍याव’, या आरोळीमुळे श्रमदानासाठी जोश वाढतच होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.