पहिली बस दाखल; मार्गावर रवाना
पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या ताफ्यात नवीन 80 बस जानेवारीत दाखल होणार आहेत. यातील पहिली बस सोमवारी दाखल झाली असून ती पुणे ते चंद्रपूर मार्गावर रात्री रवाना झाली. ही बस एसटी ने दापोडीच्या कार्यशाळेत बनविलेली असून प्रवाशांना साध्या दरातच बसमधून प्रवास करायला मिळणार आहे.
एसटीच्या पुणे विभागात तेरा डेपो आहेत. जिल्ह्याबरोबरच राज्याच्या विविध भागात 856 बसेसमार्फत एसटीकडून सेवा दिली जाते. पुणे विभागाचे दिवसाला साधारण एक कोटी 25 लाख रूपये उत्पन्न मिळते. एसटीच्या अनेक गाड्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे एसटीकडून नवीन बस विकत घेण्याबरोबरच स्वतः दापोडीच्या कार्यशाळेत बस उभारण्याचे काम सुरू आहे.
एसटीची पूर्वीची लाल बस असलेल लालपरी आधुनिक पद्धतीने बनविली जात आहे. त्यापैकी बहुतांश बसचे काम पूर्ण झाले आहे. यातील काही बस राज्यातील काही जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. तयार केलेल्या बसपैकी एकूण 80 बस एसटीच्या पुणे विभागाला मिळणार आहे. त्यामुळे पुणे विभागाचा ताफा साडेनऊशे बसच्या जवळ जाणार आहे.
नव्याने तयार करण्यात आलेली लालपरी आधुनिक पद्धतीने उभारण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व सुविधा असतील. नवीन लालपरी टू बाय टू असून 47 प्रवासी बसू शकतात. यामध्ये एशियाडसारखी सेवा असली तरी प्रवाशांना साध्या दरातच प्रवास करता येणार आहे.
अशी असेल बस…
* बसमधील सीट पुशबॅक व बकेट पद्धतीची
* प्रवाशांसाठी खिडकीच्या उंचीत वाढ
* बसचा दरवाजा ऑटोमॅटिक
* बसमध्ये इमर्जन्सी बटण
* प्रवाशांच्या मोबाइल चार्जिंगची सोय
* बसमध्ये प्रवाशांसाठी अनाउन्स सिस्टिम
* 47 प्रवाशांसाठी आसन व्यवस्था.