पुणे – राष्ट्रीय सेवा योजनेचे नवीन युनिट सुरू होणार

पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांकडून मागविले प्रस्ताव

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील महाविद्यालयांना राष्ट्रीय सेवा योजनेचे नव्याने स्वयंनिर्वाही युनिट सुरू करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी महाविद्यालयांना दि.30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी नवीन महाविद्यालये सुरू होत असतात. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना प्रभावीपणे व सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून राबविली जाते. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर दोन वर्षात त्यांचा सर्वांगीण विकास होऊन विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होण्यास मदत होते. विद्यार्थी भविष्यकाळात यशस्वी नागरिक म्हणून गौरविले जातात.

“नॅक’द्वारे ज्या महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे त्यात सर्वच निकषांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेने अतिशय महत्वाचे योगदान दिले आहे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालय, संस्था, विभागात राष्ट्रीय सेवा योजनेचे नव्याने एकक स्थापन करण्यासाठी विद्यापीठाने आवश्‍यक त्या कागदपत्रांसह महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले आहेत.

स्वयंनिर्वाही एकक सुरू करण्याचे मागणीपत्र, शंभर रुपयांच्या स्टॅंप पेपरवर हमीपत्र, मागणीचा प्रस्ताव, प्राचार्य, संचालक, विभागाप्रमुख यांचे नेमणूक व विद्यापीठ मान्यतापत्र, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्याचे नेमणूक व विद्यापीठ मान्यतापत्र आदी कागदपत्रे महाविद्यालयाने विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना ही विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्य, संचालक, विभागप्रमुख यांना दिल्या आहेत.

विद्यापीठाच्या किंवा राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रतिमेस कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार नियमित कार्यक्रमांची वेळोवेळी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. हिवाळी शिबिर चांगल्या पध्दतीने घेण्यात येतील. राबविलेल्या विविध उपक्रमांचे अहवाल, लेखा परिक्षण अहवाल वेळेत सादर करण्यात येतील. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयामार्फत घेण्यात येणारे निर्णय मान्य राहतील, असे हमीपत्रही महाविद्यालयाने सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.