Pune : नवे इच्छुक, जुन्यांची चलबिचल; महापालिका निवडणुकीसाठी अनेकजण भाजपच्या वाटेवर

पुणे – विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकांंची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेला भाजपला मिळालेले यश पाहता, महायुतीमधील घटक पक्ष तसेच महाविकास आघाडीतील पक्षांचे महापालिकेचे अनेक जण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या इच्छुकांंनी आतापासूनच भाजपच्या स्थानिक नेते तसेच विद्यमान आमदारांशी संपर्क साधत त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शविली आहे.
महायुतीत आधीच तीन पक्ष असल्याने महापालिका निवडणुकांवेळी जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. आता इतर पक्षांतूनही अनेक जण भाजपकडे जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विधानसभेत पक्षाचे काम केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठी उलथापालथ दिसण्याची चिन्हे आहेत.
राज्यात दोन वर्षांपूर्वी बदलेल्या सत्ता समीकरणानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर पुण्यात मूळ शिवसेनेतील ठराविक पदाधिकारीच एकनाथ शिंदेंसोबत गेले. तर राष्ट्रवादीतील ८० टक्के पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अजित पवारांच्या सोबत गेले. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाले. त्यातही सर्वाधिक फटका भाजपला बसला.
तर, राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यात १० मध्ये आठ जागा निवडून आल्या. त्यामुळे विधानसभेतही महाविकास आघाडीला मताधिक्य मिळेल, या आशेवर अनेक जण “तुतारी’ला पसंत देत होते. पालिका निवडणुका झाल्या तर महायुतीत तीन पक्ष असल्याने तसेच भाजपचे आधीच १०० नगरसेवक असल्याने आपल्याला तिकीट मिळण्याची शाश्वती नसल्याने अनेकांनी तुतारीला पसंती देत महाविकास आघाडीकडे जाण्याची तयारी केली होती. मात्र, विधानसभेत भाजपला विक्रमी बहुमत मिळाल्याने आता हे माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल
पुण्यात आठमधील सहा जागा भाजपने लढवल्या होत्या. या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपच्या या विजयात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारीही प्रचारात सोबत होते. त्यामुळे आता हे पदाधिकारी महानगरपालिकेसाठी इच्छूक झाले आहेत. त्यांच्याकडून तिकिटासाठी दावा केला जात आहे. मात्र, त्याच वेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारीही नगरसेवकपदासाठी प्रचारात सक्रीय झाले होते. त्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.





