पुणे : लाल रंगाच्या नवीन हळवी कांद्याची आवक मार्केट यार्डात सुरू झाली आहे. त्यातच वखारीमध्ये साठवलेला कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांदा भाववाढीला ब्रेक बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाल आहे. जुन्या कांद्याच्या भावात घाऊक बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत ६ रुपयांनी घट झाली आहे.
तर नवीन कांद्याला दर्जानुसार २० ते ३५ रुपये भाव मिळत आहे. परिणामी, किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. मागील आठवड्यात ७० ते ८० रुपये किलो भावाने विक्री होणाऱ्या कांद्याला आता ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे. दक्षिण भारतातील राज्यातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथील कांद्याला देशभरातून मागणी वाढली आहे. परिणामी, कांद्याचे भावात वाढ होत होती.
मागील रविवारी (दि.२२) येथील बाजारात सुमारे ७० ट्रक आवक झाली. त्यामध्ये वाढ झाली असून, आज (दि.२९) १०० ट्र्क आवक झाली. त्यामध्ये १० ट्र्क नवीन कांदा आहे. मागील ३ ते ४ दिवसांपासून नवीन कांद्याची आवक होत आहे. त्यापैकी २ ते ३ ट्रकची कर्नाटक, हुबळी भागातून आवक झाली आहे.
उर्वरित नवीन कांद्याची पुरंदर तालुक्यातून आवक झाली आहे. पाऊसाने विश्रांती घेतल्यास येत्या ४ ते ५ दिवसात आणखी दर्जेदार नवीन कांदा दाखल होईल. नवीन कांद्यामुळे भाव घसरतील, या शक्यतेने वखारीत साठवूण ठेवलेला कांदा बाजारात आणण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. परिणामी, कांद्याच्या भावात घ्सरण होण्यास सुरूवात झाली आहे. मागील आठवड्यात जुन्या कांद्याला किलोला घाऊक बाजारात ४४ ते ४८ रुपये भाव मिळत होता. तो कमी होऊन आता ३५ ते ४२ रुपये मिळत आहे.
“नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. येत्या काळात ही आवक वाढणार आहे. त्यामुळे भावात घसरण होण्याची शक्यता आहे.” –
बाळासाहेब राक्षे, कांद्याचे व्यापारी, मार्केट यार्ड.