पुणे : काळ जसा बदलत गेला तशी विभक्त कुटुंब पद्धत वाढत गेली. पण एकत्र कुटुंब पद्धतीचे खूप फायदे आहेत. त्याबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी, असे मत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रविवारी व्यक्त केले. लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतर्फे तळेगाव एमआयडीसी जवळ असेल्या अंबी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नव ताझ धाम या वृद्धाश्रमाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष फतेचंद रांका, सदर प्रकल्पाचे देणगीदार रुखशाना आणि मेहेर अंकलेसरिया, प्रकल्पासाठी देणगी स्वरूपात जमीन उपलब्ध करून देणारे सुधीर नाईक, लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे प्रशांत कोठडिया, योगेश शाह, आशा ओसवाल, चैताली पटनी, अनिकेत आघाव, चेतक गुगळे आणि केअरिंग हँड्स संस्थेचे सचिव अंबादास चव्हाण आदी उपस्थित होते.
सगळ्याच मुलांना आपले आई-वडील नकोसे असतात असे नाही. काही वेळेला, नोकरी, व्यवसाय, शिक्षण यामुळे आई वडिलांसोबत राहणे मुलांना शक्य होत नाही. अशा परीस्थितीत आपले आई वडील सुरक्षित अशा एखाद्या चांगल्या सुविधा असलेल्या वृद्धाश्रमात असले, तर त्यांची नीट काळजी घेतली जाईल असा विश्वास मुलांना असतो. त्यामुळे चांगल्या सोयी-सुविधा देणारे वृद्धाश्रम महत्वाचे ठरतात, असे मिसाळ म्हणाल्या.
वृद्धाश्रम या संकल्पनेच्या आपण विरोधात आहोत. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांना घडवण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे वृद्धापकाळात आई-वडिलांची काळजी घेणे ही मुलांची जबाबदारी आहे. परंतु काळ बदलतो आहे, शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने मुलांना देश-विदेशात जावे लागत आहे, त्यामुळेच वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली असल्याचे खा. बारणे यावेळी म्हणाले.
घरात कोणी नसेल तर ज्येष्ठ नागरिकांना ते घर खायला उठते, त्या चार भिंती नकोशा वाटू लागतात, त्यामुळे अशा व्यक्तीचे उर्वरित आयुष्य हे आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात जावे, या उद्देशाने या प्रकल्पाची उभारणी केल्याचे रांका यांनी सांगितले. आमच्या क्लब ऑफ पुणे सारसबागने हाती घेतलेला हा सामाजिक प्रकल्प सर्वोत्तम असल्याचे रांका यांनी यावेळी नमूद केले. प्रास्ताविक रांका यांनी केले तर तुषार मेहता आणि जुली पटवा यांनी सूत्रसंचालन केले.