पुणे – पक्षाकडून वारंवार सूचना देण्यात आल्यानंतरही स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपच्या प्रस्तावांना एकमताने पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या चारही सदस्यांचे समितीपद महापालिका निवडणूकांच्या तोंडावर धोक्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महापालिकेस सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या निविदांना पक्षाकडून विरोध करण्याच्या सूचना असतानाही या सदस्यांनी प्रस्तावास विरोध न करता मान्यता दिली. त्यामुळे, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच तक्रार करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दोन ते तीन वेळा, अशा प्रकारे पक्षाचा आदेश धुडकावत भाजपला अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यामुळे, या सदस्यांबाबत पक्षात नाराजीचा सूर असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. स्थायी समितीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदा लोणकर, अमृता बाबर, सुनील गायकवाड आणि प्रदिप गायकवाड हे सदस्य आहेत. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
प्रशासनास हाताला धरून कोट्यवधींचे प्रस्ताव आयत्या वेळी भाजपकडून मान्यतेसाठी आणले जात आहेत. या प्रस्तावांना राष्ट्रवादीचा विरोध असताना चारही सदस्य पक्षाचा विरोध असलेल्या प्रस्तावांना मान्यता देत आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरात या सदस्यांना दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. वारंवार हे प्रकार घडत असल्याने महापालिका निवडणूकीच्या तोंडावर पक्षाची कोंडी होत असल्याने या प्रकाराची तक्रार थेट अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.