पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना पाच पट मोबदला द्या – शेतकऱ्यांची आग्रही मागणी

मांजरी (विवेकानंद काटमोरे) : पुणे – नाशिक रेल्वेमार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुणे- नाशिक रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात चालू बाजार भावाच्या पाच पट मोबदला मिळावा,अशी आग्रही मागणी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान रेल्वे मार्गासाठी विरोध नसल्याचेही शेतकर्यांनी स्पष्ट केले आहे.

आज मांजरी बुद्रुक येथील जाई मंगल कार्यालयात येथील शेकडो शेतकरी एकत्र येऊन अधिकाऱ्यांना ही मागणी केली. मांजरी बुद्रुक परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आज या बैठकीला उपस्थित राहून आपल्या मागण्या अधिकाऱ्यानं समोर ठेवल्या.

यावेळी उपजिल्हाधिकारी भुमी संपादन रोहिणी आखाडे ,पुणे- नाशिक रेल्वे प्रकल्पाचे जॉईंट जनरल मॅनेजर सुनिल हवालदार ,असिस्टंट मॅनेजर शेखर भोसले आदी आधिकारी उपस्थित होते. मांजरी बुद्रुक गावच्या हद्दीतून नाशिक- पुणे रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन केले जाणार आहे.त्याच बरोबर येथे एक- दोन गुंठे जमीन घेऊन घरे बांधलेल्या नागरिकांची घरेही या मार्गात बाधित होत आहेत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बरोबरच पाण्याचे बोअरवेल, विहिरी, फळबागा नष्ट होणार आहेत. त्यामुळे याचा योग्य मोबदला मिळावा अशी आग्रही मागणी शेतकरयांनी केली आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले आहे.

“मांजरी बुद्रुक येथून नाशिक- पुणे रेल्वे मार्गासाठी फाटा असणार आहे. याठिकाणी शेतकरयांच्या जमिनी संपादित करताना चालू बाजार भावाच्या पाच पट मोबदला द्यावा,याशिवाय नुकसान होणाऱ्या फळबागा, शेतातील पिके, विहिरी यांचे तसेच बाधित होणाऱ्या घरांचा अडीच पट मोबदला द्यावा. या सर्व मागण्या मान्य केल्यास या रेल्वे मार्गासाठी आमचा विरोध असणार नाही.” – सुरेश घुले (प्रदेश उपाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.