पुणे-नाशिक, पुणे-नगर मार्गाचा वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर : डॉ. कोल्हे 

पुणे – जिल्ह्यातील पुणे-नाशिक आणि पुणे-नगर मार्गाचा वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर आहे. तो सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. त्या दृष्टीने खेड घाटातील प्रलंबित कामे आणि नारायणगाव येथील बायपासची कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. तसेच, पुणे-नगर मार्गावर पर्यायी रस्त्यांची निर्मिती करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या दोन्ही मार्गांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी नॅशनल हायवे ऑथोरीटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून, ही कोंडी सोडविण्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. खेड बायपासची कामे कशामुळे रखडली याची माहिती घेतली असून स्थानिकांशीही चर्चा करून नेमक्‍या काय समस्या आहे, त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पुणे-नाशिक मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी पुणे आणि पश्‍चिम भागांत कोलायट्रल रस्त्यांची निर्मिती करून त्यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे.

वाघोली परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी उड्डाणपुलांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. सध्या या परिसरातील लोकसंख्येची घनता पाहता चार लेन ऐवजी आठ लेनची आवश्‍यकता या ठिकाणी आहे. संपूर्ण मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावीत आहेत. मात्र, त्या आधी या परिसरात पर्यायी रस्ते बांधून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच, पीएमआरडीए हद्दीतीतील अवैध बांधकामे आणि रेड झोनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे यांनी सांगितले. राष्ट्रीय पेयजल योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुठल्या योजना सुरू आहेत, याची माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.