पुणे-नाशिक महामार्ग, की नदी?

चाकण/आंबेठाण – चाकण व परिसरात बुधवार (दि. 18) रात्री पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गवर गुरुवार (दि. 19) सकाळी 7.30 ते 8 पासून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. त्यामुळे महामर्गाला नदीचे स्वरुप आले होते. येथे अनेकांनी अतिक्रमणे करून नैसर्गिक ओढा बुजवल्याने महामार्गावर तब्बल 4 ते 5 फूटापर्यंत पाणी वाहत होते. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. तर पाण्याचे लोट वाहत असल्याने नाशिक बाजूकडे महामार्गावर तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या तर सुमारे सहा तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासानाला यश आले.

वाकी गावच्या परिसरात खासगी रहिवाशांनी गुंठेवारी जमिनी विक्री करण्यासाठी तयार केल्या आहेत. त्याच्या आजूबाजूला असणारा नैसर्गिक ओढा पाण्यासारखा पैसा खर्च करून या ओढ्याच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे. मोठ्या ओढ्यांना अटकाव करीत त्याजागी लहान पाइप टाकून पाणी वाहून जावे यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे. मोठ्या व्यावसायिक इमारतींचे मोठे काम करताना संबंधिताना जलवहनशास्त्र लक्षात आले नाही का ? आणि लक्षात आले असेल तर रस्त्याखालून जाणारे भले मोठे ओढे कुठे गेले? असे प्रश्‍न उपस्थित झाले आहे. याबाबत लगतच्या शेतकऱ्यांनी सरकार-दरबारी दाद मागण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्याची फारशी गांभीर्याने दाखल घेण्यात आली नाही. त्यामुळे भविष्यात शिंदेवाडीसारखी घटना या भागात घडल्यास त्याची जबाबदारी कोणी घ्यायची हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.

नैसर्गिक ओढा पाइप टाकून बुजवल्यामुळे व अनधिकृत बांधकामामुळे पावसाचे पाणी पाइपमधून पुढे जात नव्हते, त्यामुळे सर्व पाणी महामार्गावर आले. त्यामुळे धोका निर्माण झाला होता. जेसीबी यंत्रद्वारे ओढ्यातील पुढील बांधकाम तोडून व गाडलेले पाइप मोकळे करून तात्पुरता प्रवाह मोकळा करून दिला आहे. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. पाऊस प्रचंड असल्यामुळे पाणी ओसरण्यास खूप वेळ लागला. तरी याची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
– बाबा साळुंके, मंडलअधिकारी, चाकण

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.