नाशिक – पुणे महामार्गावर स्टेटस हॉटेल परिसरात दुपारी बाराच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एका तृतीयपंथीयाला आपला जीव गमवावा लागला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर नाशिककडे जाणारा रस्ता काहीकाळ बंद झाला होता. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि 7) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर विचित्र अपघाताची घटना घडली. संगमनेर शहरातून जाणारा जुना महामार्ग आणि नवीन महामार्गाला हॉटेल स्टेटसजवळ जोडणार्या रस्त्यावर नाशिककडे जाणार्या बाजूला आज सकाळी तिघे तृतीयपंथीय वाहने थांबवून दान मागत होते. या दरम्यान याचवेळी पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणार्या स्वीफ्ट कारच्या (क्र.एम.एच.12/इ.एक्स.2728) चालकाने महामार्गावरुन सुरू असलेल्या रहदारीकडे दुर्लक्ष करीत त्यांना दान देण्यासाठी आपले वाहल उभे केले. अचानक समोरचे वाहन उभे राहिल्याने त्यापाठीमागून आलेल्या दुसर्या कारने (क्र.एम.एच.14/एच.क्यू.1728) त्याला पाठीमागून जोराची धडक दिली. त्याचवेळी त्यापाठीमागे असणार्या तिसर्या वाहनाच्या (क्र.एम.एच.11/बी.डी.6093) चालकाचाही गोंधळ उडाल्याने त्यानेही अपघातग्रस्त दुसर्या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तीनही वाहनांचे अवशेष रस्त्यावर विखुरले तर दान मागणार्या तिघा तृतीय पंथीयातील साई अंकिता साथी या तृतीयपंथीयाचा जागीच मृत्यू झाला, तर शैलेश श्रीराम बिर्ला (वय 52) व त्यांची पत्नी सोनल (वय 46, रा. हडपसर, पुणे) हे कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराडा उडाल्याने पुण्याहून भरधाव वेगाने नाशिककडे निघालेल्या आशयर टेम्पोच्या (क्र.एम.एच.15/इ.एफ,2999) गोंधळ उडाला. जेव्हा त्याला समोर तीन वाहने अपघातग्रस्त होवून विखुरलेली दिसली, तेव्हा त्याने गडबडीने आपले वाहन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने या अपघाताचे गांभिर्य कमी झाले व सदरचा टेम्पो रस्त्याच्या मधोमध असलेल्या रस्ता दुभाजकावर चढला. मात्र टेम्पोच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
एका तृतीयपंथीयाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी जाहीर केले, तर उर्वरीत दोघा प्रवाशांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अभय परमार तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतुकीसाठी रस्ता खुला केला.