पुणे – महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पूर्व रिंगरोडच्या कामास ठेकेदाराने सुरुवात केल्याचे समोर आले आहे. यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, भूमिपूजन नसून ठेकेदार कंपनीने घेतलेल्या यंत्रसामग्रीचे पूजन असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अजून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधीही झालेला नाही. तरीसुद्धा ठेकेदार कंपनीने परस्पर भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
एमएसआरडीसीकडून पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत हा रिंगरोड करण्यात येणार आहे. पुणे नगररोड आणि सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या २४.५ किमी लांबीच्या रस्त्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून केसनंदजवळील वाडेबोल्हाई गावात आधीच काम सुरू केले आहे. सोमवारी पारंपारिक पूजा प्रकल्पाच्या कामास कंपनीकडून सुरुवात करण्यात आली. या वेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या टप्प्यावरील काम जलदगतीने करण्यासाठी शंभरहून अधिक यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. असे असताना रिंगरोडच्या कामास ठेकेदार कंपन्यांकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे रिंगरोड हा चर्चेचा विषय झाला आहे. यासंदर्भात महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन झालेले नाही. ज्या कंपनीला हे काम मिळाले आहे, त्या कंपनीने कामासाठी आणलेल्या यंत्रसामग्रीचे पूजन कंपनीकडून करण्यात आले आहे.