पुणे – मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने खडकवासला धरणसाखळी पाणलोट क्षेत्रांत शनिवारी विश्रांती घेतली. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी हा विसर्ग ८,७३४ क्युसेक होता. तो सायंकाळी ५ वाजता ४,३२३ करण्यात आला.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांचा पाणीसाठा शनिवारी सायंकाळी २८. ७३ टीएमसी ( ९९ टक्के ) झाला आहे. तर मागील वर्षी हा पाणीसाठा २७.२३ टीएमसी ( ९३ टक्के) होता. तर यंदाच्या पावसाळ्यात या चारही धरणांमधून आता पर्यंत तब्बल २९.५५ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. हे पाणी या चारही धरणांच्या क्षमते एवढे आहे. ही आकडेवारी पाहता यंदाच्या पावसाळयात ही चारही धरणे दोन वेळा भरतील इतका पाणीसाठा जुलै आणि आॅगस्टच्या पावसाने तयार झाला आहे.
शनिवारी दिवसभरात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवघा २ मिमी पावसाची नोंद झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून या सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने तीन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.