पुणे – केळी फेकून दिल्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून विट डोक्यात मारून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सुभाष धर्मा पवार (वय 49, रा. थेरगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सुभाष वाघमारे यांचा खून झाल्याप्रकरणी मुलगा किशोर याने वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक टी.एस.भोगम यांनी या प्रकरणाचा तपास केला.
पैरवी अधिकारी डी.एस.पांडुळे आणि पोलीस नाईक अरूण कोल्हे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. ही घटना 28 सप्टेंबर 2017 रोजी थेरगाव येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली. मयत वाघमारे, त्यांचे मित्र बाळू अडागळे आणि आरोपी पवार बोलत होते. त्यावेळी अडागळे याने आईसाठी आणलेली केळी वाघमारे यांनी फेकून दिली. त्यामुळे वाघमारे आणि अडागळे यांच्यात वाद झाले.
यामध्ये किरकोळ मार लागल्याने अडागळे निघून गेला. त्यानंतर पवार याने अडागळेची केळी का फेकून दिली म्हणत विट डोक्यात घालून वाघमारे यांचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. नामदेव तरळगट्टी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला.