पुणे – वारंवार पैसे मागत असल्याने कंटाळून मोठ्याने छोट्या सख्ख्या भावाचा झोपेत असताना गळा चिरून खून केला. ही घटना हडपसर येथील 15 नंबर चौकातील चाळीत घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मनोज शिवाजी गवळी (वय 28, रा. हेमाडेवाडा, हडपसर- मूळगाव हगलुर, ता. तुळजापूर) याला अटक केली आहे.
बाबू उर्फ प्रदीप गवळी (वय 23) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसरचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रदीप व मनोज हे भाड्याने घेतलेल्या घरामध्ये राहत होते. प्रदीप रिक्षा चालवत होता. तर मनोज हा ट्रॅव्हल्स बसेससाठी काम करत होता. प्रदीप त्यांच्या घरी राहत असल्याचे मनोजच्या पत्नीला आवडत नव्हते. यामुळे त्यांच्यात वाद व्हायचे. प्रदीपच्या वर्तनामुळे व व्यसनांमुळे मनोज कंटाळला होता. सोमवारी रात्री प्रदीप झोपला असताना मनोजने त्याचा खून केला.
दत्तवाडीत मित्राचाच खून, तिघांवर गुन्हा
मद्यपान करताना शिवीगाळ केल्याचा रागातून तिघांनी मित्रावर वार करून खून केला. ही घटना दत्तवाडीतील सई हेरिटेज सोसायटीलगत मध्यरात्री घडली. मंदार जोगदंड (23, रा. आंबिल ओढा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सोन्या खुळे, राजू कोतवाल, चेतन बनसोडे यांच्याविरुद्ध दत्तवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दत्ता अडसूळ (23) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील तपास करत आहेत.