पुणे : पुण्यातील धायरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आदित्य घोरपडे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
धायरीमध्ये असणाऱ्या एका बारमध्ये आरोपी व मृत आदित्य घोरपडे जेवण्यासाठी गेले होते. जेवण करत असताना एकमेकांच्या ताटातील अन्न खाण्यावरून यांच्यात वाद झाला. यानंतर ते हॉटेलमधून बाहेर पडले. यानंतर त्यांच्या वादाचे पुढे भांडणात रूपांतर झाले आणि याच वादातून पाच ते सहा जणांनी मिळून मित्राचाच खून केला.
आदित्य जेव्हा घराकडे निघाला त्यावेळी आरोपीने त्याच्या काही मित्रांना बोलावून घेतले आणि दगड व काठीच्या साहाय्याने आदित्यवर वार केले. या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.