दुसऱ्या लाटेला पुणे पालिकेचेच निमंत्रण

‘सुपर स्प्रेडर’च्या चाचण्यांना दिरंगाई : नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाई बंद

पुणे – करोनाची दुसरी लाट डिसेंबर-जानेवारीत येण्याची शक्‍यता केंद्र शासनाने वर्तविली आहे. दसरा आणि दिवाळीच्या गर्दीनंतर येणारी ही लाट रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास वेळ मिळत नसल्याने महापालिकाच करोनाच्या दुसऱ्या लाटेला निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनंतर तातडीने “सुपर स्प्रेडर’ अर्थात ज्यांच्याकडून करोना संसर्ग पसरण्याची शक्‍यता असणाऱ्या व्यक्‍तींची चाचणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. मात्र, या व्यक्‍तींचा करोनाची लक्षणे दिसण्याचा कालावधी संपत आला, तरी पालिकेने अजूनही त्यांच्या चाचण्याच सुरू केलेल्या नाहीत.

तसेच सार्वजनिक ठिकाणी, दुकान, हॉटेल, सभा, मेळावे, लग्नसमारंभात नियम पाळले जात आहेत की गर्दी केली जात आहे, याची कोणतीही तपासणी पालिकेकडून होत नसल्याने बाधित वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

शहरात करोना साथीचा आलेख ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून उतरणीस लागला होता. मात्र, त्यानंतर सण-उत्सवामुळे बाजारपेठांत विक्रमी गर्दी दिसली. यात सोशल डिस्टन्स तसेच मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय होते. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे.

प्रामुख्याने या सणांच्या कालावधीत गर्दीशी रोज संबंध येणारे व्यापारी, व्यावसायिक, हॉटेलचे कर्मचारी, पीएमपी वाहक-चालक, लोकांच्या संपर्कात येणारे महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, भाजीवाले, किराणा व्यावसायिक, दूध, पेपर तसेच घरगुती वस्तू पुरविणारे कामगार, अत्यावश्‍यक सेवा पुरविणारे शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे.

आता वेळ निघून गेली
दिवाळीच्या खरेदीसाठी दि.6 नोव्हेंबरपासून शहरात गर्दी सुरू झाली. सर्वसाधारणपणे करोनाची लागण होऊन लक्षणे दिसण्याचा कालावधी 10 ते 12 दिवसांचा आहे. तर, ही गर्दी 14 नोव्हेंबरपर्यंत कायम होती. त्यामुळे पालिकेने “सुपर स्प्रेडर’च्या चाचण्या सर्वसाधारणपणे 14 नोव्हेंबर शेवटचा गर्दीचा दिवस गृहीत धरला, तरी 26 नोव्हेंबरपूर्वी करणे अपेक्षित आहे. मात्र, आज अखेरपर्यंत “सुपर स्प्रेडर’ची तपासणी सुरू झालेली नाही. पुढील आठवडाभरात ती करण्याचे नियोजनही पालिकेकडे नाही. त्यामुळे शहराला मोठा फटका बसण्याची भीती आहे.

“सुपर स्प्रेडर’ ठरू शकणाऱ्या संभावितांची यादी तयार आहे. “माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत ही यादी संकलित करण्यात आली असून, लवकरच या सर्वांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यात, सुरुवातीला पीएमपी कर्मचाऱ्यांची तपासणी होणार आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्‍त आयुक्‍त, महापालिका 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.