पुणे : पुणे महापालिका जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त पाणी देण्याची मागणी करत आहे. जलसंपदा विभागाने पुणे शहरासाठी १४ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. मात्र, पुणे महापालिका नियमांचे उल्लंघन करुन प्रत्यक्षात २१ टीएमसी पाणी उचलत आहे. त्यामुळे पाण्याच्या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलत असल्याने महापालिकेला नोटीस बजावण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
यशदा येथे कृष्णा आणि गोदावरी खोºयांमधील नदीजोड प्रकल्पांबाबत राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषेदेत माहिती दिली. जलसंपदामंत्री या नात्याने उजनी कालवा सल्लागार समिती अंतर्गत पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांची समितीची बैठक नुकतीच घेतली आहे. त्यानंतर कुकडी धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक अहिल्यानगर येथे घेतली असून पुणे जिल्ह्याच्या पाणी वापराबाबत लवकरच कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊ, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
विखे पाटील म्हणाले की, पुणे शहरात टाऊनशिप वाढत आहेत. काही ठराविक लोकांची मात्र घरे भरली जात आहेत. हे बांधकाम व्यावसायिक सामान्यांचे पाणी पळवित आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तर दुसरीकडे पाणी कमी पडते म्हणून राज्य सरकारकडे बोट दाखवले जात आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. इमारतींना किती पाणी लागणार आहे. पाण्याचा किती पुनर्वापर होणार आहे. यापुढे पुणे महापालिकेने याचा हिशेब ठेवण्याचे काम करायचे आहे. जगातील बहुतांश शहरात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य वापराच्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो. मग, पुणे महापालिका हे का करत नाही, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यासाठी स्वतंत्र धरण?
मुंबई, नवी मुंबई महापालिकेने पाण्यासाठी स्वतंत्र धरण बांधले आहे. त्याच धर्तीवर धरणे बांधण्यासाठी महानगरपालिकेने भागीदारी करावी, अशी अपेक्षा असून पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.