पुणे, दि. 28 -यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे महापालिकेच्या तिजोरीलाही खड्डे पाडणार आहेत. पावसाळा संपताच महापालिकेकडून शहरात तब्बल 100 कोटींची रस्ते रिसर्फेसिंगची कामे केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. दरम्यान, यंदा पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यानंतर आतापर्यंत पालिकेने जवळपास 50 कोटींचा खर्च रस्त्यांच्या दुरुस्तीवर केलेला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा महापालिकेस चांगलाच महागात पडला आहे.
शहरात यावर्षी मोठया प्रमाणात समान पाणी योजना, र्डर्रेनेज, खासगी केबल कंपन्या, महावितण, एमएनजीएलच्या गॅस वाहिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात खोदाई झाली. अनेक भागांत तर पावसाळ्यातही ही खोदाई करण्यात आली. तर त्यानंतर केलेली रस्ते दुरुस्ती अतिशय तकलादू होती. परिणामी पावसाळ्यात शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळण झाली होती. महापालिका प्रशासनाने याप्रकरणई 13 ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकण्यासह, 24 अभियंत्यांवर प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. याशिवाय ठेकेदारांनाही दंड करण्यात आलेला आहे. मात्र पालिकेने ही कारवाई केलेली असली तरी पालिकेस रस्त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. तसेच जे रस्ते खराब झालेले आहेत. मात्र, अद्याप उखडलेले नाहीत ते सुद्धा प्रशासनास दुरुस्त करावे लागणार आहेत. या दुरुस्तीसाठी तब्बल 100 कोटींचा खर्च अपेक्षित असून, पावसाळा संपताच हे काम हाती घेतले जाणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयेही रडारवर
शहरातील 12 मीटरच्या वरीख खराब झालेल्या रस्त्यांना जबाबदार धरत महापालिका प्रशासनाने 13 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे. तर आता 12 मीटरच्या आतील खराब रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवरही कारवाई केली जाणार आहे. तसेच, ठेकेदारांसोबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही ही कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. क्षेत्रीय कार्यालयांकडून दोष दायित्व कालावधीत रस्त्यांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र, ही माहिती प्राप्त झाली असून, त्या आधारे रस्त्यांचे ऑडीट केले जाणार असून, संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
सुशोभिकरणाचाही घाट
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या 12 रस्त्यांना व्हीआयपी रस्ता म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती व सुशोभिकरणावर दरवर्षी मोठा खर्च केला जातो. त्यापैकी दुभाजक, दुरुस्त, पेंटिंग, थर्मोप्लास्टिक पेंट, साइन बोर्ड, कब्र स्टोन, पेडस्ट्रीयन क्रॉसिंग या कामासाठी निविदा मान्य केल्या आहेत. 12 पैकी नेहरू रस्ता, खंडुजीबाबा चौक ते पौड फाटा, खडी मशिन चौक ते येवलेवाडी, शंकरशेठ रस्ता, नगर रस्ता, स्वारगेट ते कात्रज सातारा रस्ता, बिबवेवाडी मुख्य रस्ता, बावधन मुख्य रस्ता या रस्त्यांच्या निविदा मंजूर केल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या सुशोभिकरणावरही मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जाणार आहे.