पुणे पालिकेची “करवसुली’ उणे

50 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले थकबाकीदार जास्त

Madhuvan

पुणे – शहरातील थकबाकीदारांच्या एकूण संख्येमध्ये 50 लाख रुपयांच्या आत म्हणजे 10 हजार ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदारांची संख्या जास्त असली तरी त्यांच्याकडील एकूण थकबाकी कमी आहे. परंतु, 50 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले थकबाकीदार जास्त असून त्यांच्याकडील थकबाकी हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. 50 लाख रुपयांच्या पुढे थकबाकी असलेले जे थकबाकीदार कर भरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

दहा हजार ते 50 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांची संख्या सुमारे 3,17,231 आहे. त्यांच्याकडील शास्तीसह एकूण थकबाकी 3 हजार 406 कोटी 50 लाख 5,478 रुपये आहे. 50 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले केवळ 1530च मिळकतदार आहेत. मात्र, त्यांच्याकडे मिळून 2 हजार 205 कोटी 38 लाख 23 हजार 144 रुपये थकबाकी आहे. त्यातून शहरातील निवासी, बिगरनिवासी तसेच मोबाइल टॉवरची मिळकतकर थकबाकी 5 हजार 739 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

दरमहा आकारण्यात येणाऱ्या शास्तीमुळे मिळकतकराची थकबाकी वाढत असल्याने अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर ही रक्कम आवाक्या बाहेर असल्याने ती भरण्याकडे मिळकतधारकही पाठ फिरवत आहेत. याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावरही होत आहे. प्रत्यक्षात मोबाइल टॉवर्सच्या मिळकतकराचा वाद हा न्यायालयात असल्याने सदस्यांनी यातून मोबाइल टॉवर्स या योजनेतून वगळले आहेत.

मागील वर्षी शहरात पावसामुळे झालेले आर्थिक नुकसान तसेच यावर्षी करोना संसर्गामुळे आलेल्या आर्थिक आरिष्टाचा परिणाम रोजगार, उद्योग आणि व्यवसायावर झाला आहे. अगोदरच आर्थिक घडी विस्कळीत असताना दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कराच्या बोज्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. थकबाकीवर दरमहा आकारण्यात येणारी 2 टक्के शास्ती कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून मोठ्याप्रमाणावर होत आहे. यास्तव ही योजना राबवल्यास नागरिकांना महापालिकेची थकबाकी भरणेही शक्य होणार असून, महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

महापालिकेने यापूर्वी देखील वेळोवेळी थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोबाइल टॉवर्सची थकबाकी वगळता अन्य आस्थापनांसाठी 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 असे दोन महिने ही योजना राबवावी, अशी मागणी सदस्यांनी प्रस्तावामध्ये केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.