विभागीय आयुक्तांचा अहवाल राज्य शासनाला सादर
पुणे – महापालिकेच्या हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासंदर्भातील हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याचा अहवाल शासनाला पाठवला असून ही गावे महापालिकेत समाविष्ट करावीत, असे विभागीय आयुक्तांनी अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता केवळ राज्य शासनाकडून गावे समाविष्ट करण्यासाठी केवळ आदेशाची अंतिम मोहर उमटवणे बाकी आहे.
नगर विकास विभागाने 23 गावे पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात अधिसूचनेचा मसुदा डिसेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध केला. याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे हरकती नोंदवल्या. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी यावर ऑनलाइन सुनावणी घेऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर गावे समाविष्ट करण्यासंदर्भात सकारात्मक अहवाल नुकताच सादर केला आहे.
पुणे महापालिकेमध्ये नव्याने गावे समाविष्ट करण्यासंदर्भात मागील तीन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. 2017 मध्ये महापालिकेमध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट केली जाणार असल्याचे तत्कालीन सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, तीन वर्षांत त्यावर अंतिम निर्णय झाला नाही.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 23 गावे समाविष्ट करण्यासंदर्भात हालचालींना वेग आला. यापूर्वी नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत सकारात्मक अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला होता.
आता विभागीय आयुक्तांनीसुद्धा याबाबतचा अहवाल सादर केला आहे. याचसह महापालिकेनेदेखील ही गावे समाविष्ट करण्यासंदर्भात ना हरकत असल्याचे पत्र राज्य शासनाला पाठवले आहे. त्यामुळे आता राज्य शासनाकडून 23 गावे समाविष्ट करण्याचे अंतिम आदेश काढणे बाकी आहे.
नागरिकांना सुविधा मिळतील
शहरालगतच्या या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. या गावांना पाणीपुरवठा, रस्ते, कचरा प्रक्रिया प्रकल्प या पायाभूत सुविधा देण्यास ग्रामपंचायतींवर मर्यादा येतात. या सर्व पार्श्वभूमीवर ही गावे पालिकेत समाविष्ट केल्यास या गावातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देणे पालिकेस शक्य होणार आहे.
पालिकेत समाविष्ट होणारी गावे
नांदेड, खडकवासला, नऱ्हे, सूस, मांजरी बुद्रुक, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली,म्हाळुंगे, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे