पुणे – महापालिका शाळेतील मुलांच्याही हाती येणार टॅब

ऑनलाइन शिक्षण थांबू नये यासाठी प्रशासन खरेदी करणार

पुणे -महापालिका शाळांमधील ज्या मुलांकडे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा नाही, त्यांच्यासाठी पालिकेकडून टॅब खरेदी केले जाणार आहेत. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी याबाबतचा प्रस्ताव दिला होता.

महापालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल 1 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, त्यातील सुमारे 65 ते 70 टक्‍के मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी कोणतेही साधन नाही. त्यातच, महापालिकेडून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्यासाठी निधी गेल्या दोन वर्षांपासून अंदाजपत्रकात पडून आहे.

तो मुलांना इंटरनेट पॅक तसेच टॅबलेट खरेदीसाठी उपलब्ध करून द्यावा, असा हा प्रस्ताव होता.
करोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी महापालिकेच्या शाळा ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. मात्र, अनेक पालकांकडे मोबाइल असले तरी लॉकडाऊनच्या काळात हाताला रोजगार नसल्याने इंटरनेटची सुविधा नाही.

तसेच, कुटुंबात दोन ते तीन मुले असल्याने प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र ऑनलाइन शिक्षणाची सोय नाही. तर, त्यासाठी पैसेही नाहीत. महापालिका दरवर्षाच्या सुरुवातीला पालिकेच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून गणवेश, दफ्तर, रेनकोट, बूट, स्वेटर तसेच शालेय साहित्याचा निधी जमा करते.

2020-21 या आर्थिक वर्षाची ही डीबीटीची रक्‍कम शिल्लक आहे. तसेच यंदाहीही ती शिल्लक राहणार आहे. तर, मुलांना ऑनलाइन शिक्षणाची सोय द्यायची झाल्यास 25 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारा ठराव डॉ. धेंडे यांनी स्थायी समितीत दिला होता. त्यास समितीने मान्यता दिली असून शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची माहिती घेऊन ही खरेदी केली जाणार असल्याचे रासने यांनी स्पष्ट केले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.