पुणे – गेल्या दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीची अंतिम मंजुरी “नॅशनल मेडिकल कमिशन’ कडून (एनएमसी) अखेर प्राप्त झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याला परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची नवी दिल्लीतील आरोग्य मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. या भेटीत सकारात्मक चर्चाही झाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर मंजुरीसंदर्भातील सर्व टप्पे पार केले असून, आता प्रत्यक्ष परवानगी मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.
दरम्यान, या वैद्यकीय महाविद्यालयासाठी कमला नेहरू रुग्णालयाशेजारील महापालिकेच्या बाबुराव सणस शाळेमध्ये वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत तसे लॅब आणि अन्य सोयीही उभारण्यात आल्या आहेत. हे महाविद्यालय कमला नेहरू रुग्णालयाशी संलग्न करण्यात आले आहे. या परवानगींसाठी एनएमसी’च्या पथकाने अनेकदा पाहणी केली, माहिती मागवली. तसेच नियमांवर बोट ठेवत परवानगी नाकारण्यात आली होती. महापालिकेला एनएमसी’कडे पुन्हा अपील करण्याचीही मुभा होती मात्र ती डिसेंबर 2021 मध्ये संपली. जानेवारीपासून पुन्हा नव्याने प्रक्रिया करून ही परवानगी मिळवण्यात आली आहे. दरम्यान, आता या महाविद्यालयातील प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया कधी सुरू केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
असा झाला वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवास…
28 ऑगस्ट, 2019 : मुख्यसभेत ठराव मंजूर
26 मे, 2020 : वैद्यकीय ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य सरकारची मंजुरी
13 ऑगस्ट, 2020 : वैद्यकीय ट्रस्टची नोंदणी
28 नोव्हेंबर, 2020 : “एमयूएचएस’ कडून
ऍफिलिएशन कन्सेंट प्राप्त
7 मार्च, 2022 : अंतिम मंजुरी
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरी मिळणे हा क्षण पुणे शहरासाठी जितका महत्वाचा आहे, तितकाच तो अभिमानाचाही आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकल्पनेपासून तर थेट अंतिम मंजुरी मिळेपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये भूमिका निभावता आली, याचे मनस्वी समाधान आहे. आपल्या पाठपुराव्याला सर्वांची साथ मिळाल्याने अंतिम मंजुरीपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे