प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सवलतीच्या उपचारांसाठी दर महिन्याला हमीपत्र घेऊन जावे लागत होते, त्याची मुदत आता तीन महिन्यांची केली आहे. त्यामुळे रुग्णाचा किंवा त्याच्या नातेवाईकाचा दर महिन्याचा हेलपाटा वाचणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरी गरीब योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लाभार्थींना योजनेचे स्वतंत्र कार्ड देण्यात आले आहे. रुग्णांना उपचारांमध्ये सवलत मिळावी, यासाठी दर महिन्याला महापालिकेत येऊन हमीपत्र घेऊन जावे लागते. यासाठी रुग्ण आणि त्याचे नातेवाईक महापालिकेत गर्दी करतात. त्यांना बराच वेळ रांगेत थांबावे लागते. त्यामुळेच आता एक महिन्याऐवजी तीन महिन्यांसाठी हे हमीपत्र देण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
जे रुग्ण केमोथेरपी, डायलिसिस अशा महागड्या आजारांवर खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाहीत, त्यांना महापालिका सवलतीच्या दरात हमीपत्राच्या आधारे उपचार देते. नवीन इमारतीच्या तळमजल्यावर हमीपत्रासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सोमवारी रुग्णांना हमीपत्र देण्यात येणाऱ्या कक्षामध्ये मनुष्यबळाची कमतरता होती. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातील काहींनी आरोग्य प्रमुखांकडे संताप व्यक्त केला. त्यावेळी हमीपत्रासाठी महिन्याला हेलपाटे मारण्याची गरज नाही, तीन महिन्यांनी पत्र देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
शहरी गरीब योजनेच्या पत्रासाठी दर महिन्याला येऊ लागू नये यासाठी आता तीन महिन्यांसाठी पत्र दिले जाणार आहे. काही रुग्णालयांनी याला तातडीने होकार कळवला आहे, तर काही रुग्णालयांनी नकार दिला आहे. मात्र, प्राधान्याने हे काम पूर्ण केले जाणार आहे.
– डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका