पुणे – करोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध, राज्यातील दोलायमान राजकीय स्थिती आणि ओबीसी राजकीय आरक्षण या मुद्यामुळे महानगरपालिका निवडणूक लांबणीवर पडणार अशी चर्चा असताना प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी (दि.25) आणि शनिवारी (दि.26) हरकती-सूचनांवर सुनावणीही झाली आहे. तर, दि. 2 मार्चला या संदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाकडे जाहीर होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतर प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. महानगरपालिका निवडणुकी संदर्भातील ही प्रक्रिया वेळापत्रकानुसार सुरू असताना निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. अर्थातच महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतरच नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, आयोगाकडून नगरपालिका निवडणुका संदर्भातील जाहीर केलेले वेळापत्रक पाहता पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक वेळेतच होईल, असे राजकीय जाणकार ठामपणे सांगत आहेत.
महानगरपालिका तसेच नगरपालिका निवडणुका लांबणीवर पडण्यामागे ओबीसींचे राजकीय आरक्षण हाच मुख्य मुद्दा आहे. परंतु, हे आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने वेगावान हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून मुदत संपलेल्या महापालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम वेळापत्रकानुसार राबविला जात आहे.
नगरपालिकांसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. 2 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना आहेत. तर, दि. 2 मार्चला पुणे महानगरपालिका प्रभाग रचनेबाबतचा अंतिम अहवाल आयोगाला सादर केला जाणार आहे.
नगरपालिकेच्या प्रभागरचनेवर दि. 10 ते 17 मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. याच कालावधीत पुणे महापालिकेची प्रभाग आरक्षण जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. नगरपालिकांच्या अंतिम प्रभागरचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग दि. 1 एप्रिलपर्यंत जाहीर करणार असताना त्याच कालावधीत पुणे महापलिकेची निवडणूक जाहीर होईल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
मुदत कधीच संपलीय…
निवडणूक आयोगाने मे 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि मुदत संपणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी जिल्ह्यातील बारामती, शिरूर, दौंड, लोणावळा, चाकण, राजगुरूनगर, जेजुरी, आळंदी, सासवड, तळेगाव दाभाडे, जुन्नर आणि इंदापूर यापैकी सात नगरपालिकांची मुदत याच महिन्यातच संपली आहे. तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि जुन्नर नगरपालिकांची मुदत जानेवारी महिन्यातच संपलेली आहे. याशिवाय चाकण नगरपालिकेची मुदत नोव्हेंबर 2020 तर राजगुरूनगर नगरपालिकेची मुदत मे 2020 मध्ये संपलेली आहे. यामुळे या निवडणुका वेळेतच होणार असून तत्पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेचा निकाला हाती आलेला असेल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.