पुणे पालिका निवडणूक : प्रभागावरून राजकीय कुजबुज सुरु

राजकीय पक्ष लागले कामाला : प्रभाग असा असावा की तसा असावा

– हर्षद कटारिया

बिबवेवाडी – महानगरपालिका निवडणुकीला अवघे एक वर्ष कालावधी राहिला आहे. यामुळे प्रमुख राजकीय पक्षांकडून आराखडे आखले जावू लागले आहेत. काही पक्षांनी आपल्या नव्या कार्यकारिणी जाहीर केल्या आहेत. आपलाच पक्ष शहरात सरस कसा, हे नागरिकांवर बिंबवण्याची जबाबदारी अनेकांवर टाकण्यात आली आहे. पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे परिसरात कार्यकर्त्यांमध्ये 2022ला काय होणार? याबाबतची चर्चा रंग घेवू लागली आहे.

इच्छुक उमेदवारांनीही प्रभागात मतांची बांधाबांधी सुरू केली आहे. प्रभाग करण्यासह, वार्ड कसे पाडण्यात येतील? परिसर कसे विभागले जातील? याबाबतची राजकीय कुजबुज सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांची कामे होण्यासाठी कितीचा प्रभाग असावा, लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा काय, याबाबत लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार व नागरिकांची मते प्रभातने जाणून घेतली.

प्रभाग कितीचा आणि कसा पडेल? हे येत्या काळात कळेलच. पण, माझ्या मते नागरिकांची कामे प्रामाणिकपणे करणाऱ्या लोकप्रतिनिधीला प्रभाग कसाही पडला, तरी अडचण येणार नाही. नागरिकांशी संपर्क असलेला लोकप्रतिनिधीला कितीचाही प्रभाग असला तरी यश हमखास मिळणारच.
– प्रवीण चोरबेले नगरसेवक


प्रभाग चारचा असेल तर नागरिकांची कामे होण्यास चांगला स्कोप मिळतो. मात्र, नगरसेवकाचे काम चांगले असेल जनसंपर्क असेल आणि काम करण्याची मानसिकता असेल तर कितीचाही प्रभाग पडला तरी काहीच फरक पडणार नाही, हे नक्की.
– श्रीनाथ भिमाले, नगरसेवक


नागरिकांची कामे होणे, त्यांच्या समस्या सोडविणे महत्वाचे आहे. त्यामुळे प्रभाग कितीचाही पडला तरी नागरिकांची कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधीला काही अडचण येणार नाही. नागरिकांच्या समस्यां सुटणे गरजेचे आहे. आमची हिच भूमिका कायम राहिलेली आहे.
– राजश्री शिळीमकर, नगरसेविका


नगरसेवक एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा निवडणूकीस उभे राहायला परवानगी नसावी, असा कायदा झाला पाहीजे. पालिकेच्या खर्चातून बांधलेल्या वास्तूंना स्वतःच्याच घरातील व्यक्तींची नावे त्याने देऊ नयेत. नैतिकता जपत जनहितार्थ काम करणारा लोकप्रतिनिधी असावा.
– एकनाथ ढोले, शिवसेना


प्रभाग एकचा असला तर नागरिकांची कामे होणे सोयीचे जाईल. नागरिकांना दुसऱ्या लोकप्रतिनिधीकडे बोट दाखवून जबाबदारी झटकता येणार नाही. नागरिकांच्या कररूपी पैशातून स्वतःच्या प्रसिद्धीचा हव्यास पूर्ण करणारा नगरसेवक काय कामाचा?
– भरत सुराणा, कॉग्रेस


प्रभाग चारचा असेल तर नागरिकांची कामे करणे सोयीचे जाते. नगरसेवकांनी तळमळीने नागरिकांची कामे करावीत. स्थानिक भागातील कार्यकर्ता असेल तर परिसराची माहिती असते. जनतेशी नाळ जोडणारा असावा. राजकारण नव्हे तर सामाजिक कार्य म्हणून करणारा नगरसेवक पाहिजे.
– गणेश शेरला, भाजप


प्रभाग एकचा असणे नागरिकांच्या हिताचेच राहील. अन्यथा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याची अनेक उदाहरणे प्रभाग क्रमांक 28 मध्ये आहेत. नगरसेवक हा जनता हेच त्याचं कुटुंब मानणारा असावा. जो भ्रष्टाचार विरहित सेवा करणार तोच खरा नगरसेवक!
– ललित ओसवाल, सामाजिक कार्यकर्ता


निवडणुकीत प्रभाग दोनचा असला पाहिजे. त्यामुळे महिला व अन्य सामाजिक आरक्षणाचा लाभ सर्वांना मिळेल. द्विसदस्य पद्धतीत एकाने जबाबदारी टाळल्यास सोबतच्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीकडे दाद मागणे जनतेस सोईचे होईल. चार सदस्य पद्धतीमुळे तशी संधी जनतेस मिळत नाही.
– बाळासाहेब अटल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष


प्रभाग एकचा लोकहिताचा राहील. नगरसेवकाने सामाजिक बांधिलकी जपत विचारांची जडणघडण केली पाहिजे. एक सदस्यीय वार्ड असल्यास मुलभुत गरजांच्या विकास कामांवर ताण येणार नाही. नागरिकांना विपरीत परिणामांच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
– राहुल गुंड, नागरिक 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.